७ मे १८६१ – ७ ऑगस्ट १९४१
जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ (१८१७–१९०५) आणि आई शारदादेवी (१८२६/२७–१८७५). त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर गावी स्थलांतर. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय (१७७२–१८३३) यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्मसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्मसमाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती.
